Skip to content Skip to sidebar Skip to footer

रानातला पाऊस

“कसा कसा पानीऽऽ?”
“असा पानीच नाई पायलूऽऽ!”
“या पान्याना ठेवूनच दिलाऽऽ!”
“मनमानी पानीऽऽ!”

धानाचा बांद्या आणि पलीकडे नागझिर्‍याचं जंगल

ऐकत रहावं असा ढाला आवाज असलेले मधुभाऊ मला पावसाबद्दल सांगत होते. हे सांगत असताना त्यांचा आवाज मोठा झाला होता. उभ्या गावानं असा पाऊस कधी पाहिला नव्हता असं प्रत्येकाचं मत होतं. बुडगेबाडगे, तरणेताठे सगळे डोळे मोठे मोठे करून पावसाबद्दल बोलत होते. हा पाऊस म्हणजे मध्यंतर नसलेला सलग अठरा तासांचा सुंदर चित्रपट होता. दिग्दर्शक होता मान्सूनचा वारा.

          “जंगी बारीऽ!”

          “जास्तीच येऊन रायला!”

     ओल्या, हिरव्या गवताचा भारा डोक्यावरून घेऊन जाणारा गोपीचंद मला पाहून थांबला. उभ्याउभ्याच बोलला. बेसुमार पावसामुळे त्याला गायी-वासरांना चारायला रानात नेता आलं नव्हतं.

     आमच्या झाडीमंडळातले लोक तसे निवांत असतात. विशेषतः गावखेड्यात राहणार्‍या लोकांच्या आयुष्यात तर फार कमी गुंतागुंत असते. इथल्या कडकडीत उन्हासारखं लख्ख आयुष्य. या लोकांपाशी वेळ असतो. ते रबर ताणावं तसा शब्दातल्या शेवटच्या अक्षराचा उच्चार लांबवतात. झाडाझुडपांच्या दाटीवाटीत एकमेकांचं बोलणं नीट ऐकू यावं म्हणून ओरडल्यासारखं बोलतात.

गवताचे भारे घेऊन जाणारी गोंड महिला

     या पावसाबद्दल लिहिताना मला पाणी भरलेल्या ढगासारखं भरून येत होतं.

     सूर्यानं डोंगराच्या पलीकडे बुडी घ्यायच्या दोन घटका आधी या पावसाची टिपरी वाजली. मग नंतर त्यानं सुस्ती केली नाही. कुणालाही सोडलं नाही. सगळ्यांना मस्त झोडपून काढलं. आमच्या घराच्या पत्र्यावर रात्रभर टिपेचा ताशा वाजत राहिला. सकाळी भुर्‍याशेठाच्या छेलबटाऊ कोंबड्याची बांग दबल्यासारखी ऐकू आली. मी उठून बाहेर पाहिलं, तर अंगात आल्यासारखा पाऊस पडतच होता. घरांच्या झापींवरून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. जमिनीवर पडणार्‍या पाण्यामुळे तयार होणार्‍या बुडबुड्यांना सेकंदासेकंदाला फुटावं लागत होतं अशा धारा. असा पाऊस.

     गावाच्या बाहेर नवीन बिर्‍हाड केलेल्या टेकामांच्या घरात साप निघाला म्हणून बाहेर पडलो तेव्हा एक मोठ्या थेंबांची चरक आली. सोबत भरारणारा वारा. धोका झाला की कासव अंगपाय आत ओढून घेतं तसं गाव गपगार होतं. अशा पावसात कोण बाहेर पडेल? गावओढ्याला पाणी चढल्याचं समजल्यावर दोन-तीन जवान पोरं छत्र्या घेऊन बाहेर पडली. या पोरांच्या अंगात पावसाची मस्ती होती. बकरीच्या शेपटीसारख्या त्यांच्या बांड्या छत्र्या काय कामाच्या? पाठ भिजू लागली म्हणून छत्री मागे केली, की पोट भिजत होतं. पोट भिजू लागलं म्हणून छत्री पुढे केली, की पाठ भिजत होती. अशा पद्धतीने फार थोड्या वेळात उभा माणूस पाठपोट भिजत होता. पोरंही अशीच भिजत होती. पावसाची मजा घेत होती. उसळता ओढा पाहून उसळत होती. पाऊस त्यांना गुदगुल्या करत होता. ती हसत-खिदळत होती. छोकरा म्हणावा असा ओढासुद्धा ऐन भरात होता, तर खोल जंगलातला त्याचा बाप कसे कसे रंग दाखवत असेल!

घराच्या झापीवरून अंगणात पडणारं पावसाचं पाणी

     टेकामांच्या घरात सापबीप काही दिसला नाही म्हणून मी माघारी फिरलो. पावसानं स्वच्छ धुतलेल्या काळ्या कुळकुळीत रस्त्याची कड धरून चालू लागलो. पावसाच्या पाण्यानं लोटून आणलेल्या काडीकचर्‍याचे, भुसकटाचे, पातेर्‍याचे ढीग जागोजाग तयार झाले होते. तिथे पाणी अडून राहिलं होतं. अखिल पिटेझरी बेडूक महासंघाचा अध्यक्ष शोभावा असा एक ढोरबेडूक शेताच्या बाजूनं वाहणार्‍या पाटाच्या कडेला बसला होता. हा लडदू माझ्या माहितीचा होता. मला तो नेहेमी दबा धरून बसल्यासारखा वाटायचा. मी जरा जवळ जाताच त्यानं छलांग मारली आणि फताक्दिशी पाण्यात पडला.

ढोरबेडूक – Indian Bullfrog

     मी डोळे किलकिले करून सहज वर पाहिलं. आभाळ एकाच पांढुरक्या-राखाडी रंगाचं दिसत होतं. सर्वात खालचे ढग संथपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वहात होते. आभाळ जवळ आल्यासारखं वाटत होतं. आपल्या डोक्यावर आकाशीच्या कुंभारानं काळ्या मातीचा भलामोठा घडा भरून ठेवलाय असं वाटत होतं. हिरव्या धानाची करकरीत पाती वार्‍यावर लहरत होती. लांबून पाहिलं तर ती आपापसात मस्ती करत आहेत असं वाटत होतं. शेतांच्या पलीकडे ऐन, धावडा, मोह, भेरा, बेहेडा, साग, कुंभा, रोहण, तेंदू, बहावा अशी झाडं पाऊस झेलत उभी होती. जणू जंगलचौकीतले रखवालदार खडा पहारा देत उभे होते. शेतांच्या बाजूला उगवून आलेलं पडार गवताचं बेट वार्‍यावर डोलत होतं. त्याचे पांढरेफेक तुरे माना वर करून बघणार्‍या बगळ्यांसारखे दिसत होते.

     ठाय लयीतला पाऊस पडू लागला, तेव्हा शिंजीर पक्ष्याचा जोडा जास्वंदीच्या लालभडक फुलांवर येऊन गेला. त्यांची घाई डोळ्यांना दिसत होती. सुईसारख्या पण बाकदार चोचीनं पुष्पकोशालाच छिद्र पाडून त्यांनी मधुरस लुटला. सदा इकडेतिकडे करणार्‍या कोंबड्या वसू बसल्यासारख्या जमिनीला पोट लावून बसल्या होत्या. त्यामुळे परिसरातली एक हालचाल कमी झाली होती.

पडार गवताचे तुरे

     या पावसाचा अवतार बघून गायक्यांनी आपापल्या म्हशी पळवतच घराकडे आणल्या. पावसानं झोडपल्यामुळे त्या स्वच्छ काळ्या दिसत होत्या. उत्तरा नक्षत्रातील या पावसानं म्हशींनासुद्धा बरं रुप दिलं होतं. तळ्याच्या मागे वडाच्या डोंगरावर एक काळाघोर गर्जनदास उठला होता. त्याच्याकडे बघून भलावी म्हातारा डोळे मोठे करून म्हणाला –

          ‘दादाऽ हा आपला गाव धरनार!”

     कास्तकाराच्या टंगुलीतून वाचलेलं, मध्यम आकाराचं सागाचं एक झाड बांदीच्या धुर्‍यावर (बांधावर) उभं होतं. या झाडाच्या खालच्या फांदीवर विणीच्या पिसार्‍यातला बालेभोक अंगावर पाऊस घेत बसला होता.

पिटेझरी तलाव आणि सुई हुडकी

     एवढ्या पावसातही बाहेर पडणार्‍या पक्ष्यांमध्ये बालेभोकानं आघाडी घेतली होती. भरून आलेल्या आभाळाखालून दोन अडई बदकं वेगात पंख हलवत पूर्वेकडे जाताना दिसली. त्यांच्या तिमिराकृती लहान मुलांच्या निसर्गचित्रातील पक्ष्यांसारख्या वाटल्या. पीकपाणी बघायला म्हणून बाहेर पडलेला हगरू गोंड घडीभर थांबला. मग घसरड्या बांधावरून सावकाश असा पुढ्यात बघत चालू लागला. इतक्यात हिरव्या धानातून फुटावा, तसा एक बालेभोक दचकून उडाला. कॉक्-कॉक् असा खर्जातला आवाज काढून त्यानं नाराजी दाखवली आणि पांढर्‍या शिटाची लांबलचक जाडसुती पिचकारी उडवली. ती धानाच्या बांदीत पडली. पाच-सहा खाचरं पंखाखालून गेली, तसा तो एका बांधावर उतरला. चार ढांगा टाकत त्यानं मोक्याची जागा पकडली आणि पुन्हा एकदा शिकारध्यान लावलं.

     वेळकाळ मिटावी असा पाऊस पडत होता. भलमार. या पावसानं माणसांना घरी पिटाळलं. शेताशिवारातली जा-ये कमी झाली. नेमकी हीच वेळ पकडून एक लाजरी पाणकोंबडी भुंडी शेपटी उडवत झाडशीतून बाहेर पडली. सावधपणे इकडेतिकडे बघत फिरू लागली. जरा कुठे खुट्ट झालं, की धानाच्या करकरीत बिछायतीत घुसायच्या तयारीत जमिनीवर किडे शोधू लागली. तिला पावसाचं काही नव्हतं. शेताच्या कडेला उभ्या असलेल्या आलईच्या (बारतोंडी) झाडात तिचं वाडग्यासारखं घरटं होतं. धानावर साऊल येते म्हणून हे झाड शेतमालकानं तोडलं होतं. त्याला पाऊसकाळात असे जोमदार टाळे फुटले, घसघशीत पानांची अशी गच्च जाळी तयार झाली, की पाणकोंबडीला घरट्यासाठी जागा सापडली.

     हा पाऊस दुपारनंतर कमी झाला. अटकत अटकत पडू लागला. झाडांनी भरलेल्या डोंगरांचे माथे पुन्हा दिसू लागले. इतका वेळ सपरीत अडकून पडलेली कबर्‍या रंगाची कोंबडी फडफडत बाहेर पडली. पाठोपाठ तिची मुठीएवढी पिल्लं पिळुकपिळुक करत धावली. जमिनीवर टोचा मारून कोंबड्या काहीबाही टिपू लागल्या. धानाच्या शेतांवर उडणार्‍या आणि उडत्या किड्यांचा समाचार घेणार्‍या चतुरांची संख्या एकदम वाढली. मला छंद लागला. एकच चतुर निवडायचा आणि त्याला सतत नजरेत ठेवायचं. तो कुठे जातो, काय करतो हे बघायचं.

Ruddy Marsh Skimmer चतुराचा नर

     मग कळलं की जवळजवळ सगळे चतुर साधारण एकाच भागात उडत होते. त्यांच्या हालचाली हवाई येरझार्‍या घातल्यासारख्या दिसत होत्या. हवेतून एखादा काळू कोतवाल झेपावला, की चतुरांची ही सेना चमकत होती. त्याला हूल देत होती. सुदृढ जलपरिसंस्थेचे सूचक असलेल्या शेकडो, हजारो चतुरांना मायाळू पावसानं जन्म दिला होता.

     झिमुरझिमुर पावसात पुष्कळ चतुर दिसत होते. फुलपाखरं मात्र फारच कमी होती. गुलाबी मदालसा फुलपाखराचा एक नर चिखलपान करण्यात दंग होता. वार्‍यामुळे त्याचे दोन्ही पंख हलत होते, तरीही त्याची चिखलावरची पकड सुटली नाही. टपोरा असा मोठा चांदवा तर माझ्या प्रेमातच पडला! तो वेगात उडत आला आणि सरळ माझ्या हातावर येऊन बसला. हबशी हे फुलपाखरू त्यामानानं सहज दिसत होतं. एक हबशी चिखलपान करणार्‍या मदालसाच्या बाजूनं उडत जात होतं. त्याला बघून चिखलपान सोडून मदालसा उडालं आणि हबशीच्या पाठी लागलं. त्याला काही अंतरापर्यंत घालवून मदालसा चिखलटीकडे परतलं. शेताच्या कडेनं उगवलेल्या गवतुरीवर हळदी रंगाचं तृण पिलाती भिरभिरताना दिसलं. मधुमालतीच्या एका मोठ्या पानाच्या मागे एक प्रवासी फुलपाखरू असं बसलं होतं की दाखवूनही एखाद्याला पटकन् दिसू नये. ते पंख मिटवून पानाच्या मागे लटकून राहिलं होतं. कमालीचं सरूप झालं होतं.

     पावसानं आवरतं घेतलं, तसे पक्ष्यांनी ओले पंख पसरले. भेरली माडाच्या शेंड्यातून हिरव्या भाल्यासारखा (या भाल्यात गुरगटून लपेटलेली एक आख्खी डहाळी होती, हे मला तो भाला उलगडल्यानंतर कळलं!) दिसणारा फुटवा बाहेर आला होता. तिरपा असा. चांगल्या वार्‍यातसुद्धा तो अजिबात हलत नव्हता. त्याच्या टोकाशी चिमुकल्या ठिपक्यांच्या मुनियानं बसायला जागा पटकावली. भाल्याच्या टोकावरून सगळा परिसर दिसत होता. याच माडावर झावळीच्या बेचक्यात मुनियाच्या जोड्यानं घरट्याचा चेंडू बसवला होता. पाऊस थांबताच नर-मादीचं काम सुरू झालं. गवती रानात उतरायचं. एखादं गवताचं पातं खुडायचं आणि उडत उडत घरट्याकडे यायचं. वार्‍यावर भुरभुरणारं गवताचं लांबसडक हिरवंगार पातं चोचीत धरून लगबगीनं घरट्याकडे निघालेला पिटुकला मुनिया ही पाऊसकाळातली एक खास गोष्ट आहे. चुकवू नये अशी.

भेरली माड
सापेला गवताच्या बिया खाताना ठिपक्यांचा मुनिया
गुलाबी मदालसा फुलपाखराचा नर
माझ्या हॅवरसॅकच्या पट्ट्यावर बसलेलं मोठा चांदवा फुलपाखरू

     जंगलाच्या काठावर उभ्या असलेल्या बेहेड्यावर बसून कुक्कुडकुंभ्यानं घागर फुंकली –

          “उहूप-उहूप-उहूप-उहूप!”

     खड्या आवाजात पावशा साद घालू लागला –

          “पेर्ते व्हा – पेर्ते व्हा!”

     उजेड वाढला. वार्‍याच्या काही झुळका आल्या. मानवेल बांबूच्या रांजीच्या बाजूला कोचई उगवून आली होती. तिचं एकच पान नाही नाही म्हटल्यासारखं हलत होतं. बांबूच्या पात्यांच्या टोकांशी पाण्याचे थेंब झुलु लागले. आळूच्या पानावरचे थेंब रूप्याशी स्पर्धा करू लागले.

कोचईच्या पानावर थबकून राहिलेले पावसाचे थेंब

ढांगोळ्या पायांची एक मोठी कोंबडी कुणीतरी मारून फेकलेला उंदीर चोचीत धरून लगालगा आडोसा जवळ करताना दिसली. शेपूट झडलेली एक तीनपट्टी खार बांबूवरून सरसरत खाली उतरली. पाठीची धनुकली करून टुण टुण उड्या मारू लागली. मध्येच थांबत मण्यांसारख्या डोळ्यांनी टुकुटुकु इकडे तिकडे बघू लागली.

तीनपट्टी खार. झाडीपट्टीत हिला खराडी म्हणतात.

     मी छत्री घेऊन तळ्यावर आलो. सुई हुडकीवर ढग उतरले होते. ती मऊसूत पांढरी ओढणी घेऊन खिडकीतून डोकावणार्‍या सुंदर तरूणीसारखी दिसत होती. पाण्यातून बाहेर आलेल्या कासवाच्या पाठीसारख्या दिसणार्‍या दगडावर एक छोटा पाणकावळा बसला होता. थोरल्या धोब्याची एक जोडी काठावर धावत होती. लांबसडक शेपट्यांचं धुणं बडवत होती. तळ्याच्या पोटात शेती असलेल्या शेतकर्‍यांच्या पोटात गोळा यावा असा पाऊस झाला होता. एकाएकी आकाशातली म्हातारी जात्याचा खुंटा हलवून दळण दळू लागली. राखाडी रंगाच्या ढगांच्या मागून विजांचे झोत फाकू लागले. भुरभुरता पाऊस सुरू झाला. पुष्कळशा पक्ष्यांचे आवाज बंद झाले. पावशा मात्र व्रत घेतल्यासारखा न थांबता साद घालत होता.

          “कडाड!”

     असा आवाज फार जवळून आला.

     राखाडी-काळ्या ढगांवर लफ्फेदार सही करून एक वीज लुप्त झाली.

     अशा आभाळाखाली थांबावं असं वाटलं नाही. मी घराकडे नेणारी वाट पकडली. बेडकांचा कोरस ऐकत ऐकत गावापाशी आलो. एका मोहोरलेल्या सागावर लांब शेपटीच्या टकाचोराचा जोडा बसला होता. पावसात भिजल्यामुळे पडार गवताच्या तुर्‍यांनी माना टाकल्या होत्या. आता पडणारा पाऊस पिरपिर्‍या होता. घर जवळ येईपर्यंत त्याला उडवून लावणारा वारा सुटला. मावळतीच्या दिशेला कापशी ढगांची सोनसभा भरलेली दिसली. हळूहळू आमच्या गावावरचा ढगांचा फड उठला. वार्‍याच्या पाठुंगळी बसून ढगांची सहल निघाली. आनंदाच्या बागा फुलवून पाऊस थांबला. अन्नब्रह्माची पूजा करणार्‍या अवघ्या सृष्टीला पाणी पाजूनही आभाळ कधी दमगीर झाल्याचं दिसत नाही.

बहरले चैतन्याचे मळे!

***

शब्दांचे अर्थ

  1. बुडगेबाडगे – म्हातारेकोतारे
  2. झाडीमंडळ – झाडीपट्टी – महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा भूभाग ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखला जातो. या भूभागात बोलल्या जाणार्‍या मराठीच्या एका बोलीला ‘झाडीबोली’ असं म्हणतात.
  3. छेलबटाऊ – ऐटबाज, नटवा
  4. चरक – पावसाची सर, चळक, शिरवा
  5. ढोरबेडूक – Indian Bullfrog
  6. कास्तकार – शेतकरी
  7. टंगुली – कुर्‍हाड
  8. बांदी – खाचर
  9. धुरा – शेताचा बांध
  10. बालेभोक – Indian Pond Heron नावाचा एक पाणपक्षी, वंचक, भुरा बगळा, खरबा बगळा
  11. शिंजीर – Purple-rumped Sunbird
  12. अडई बदक – Lesser Whistling Duck मराल
  13. तिमिराकृती – Silhouette
  14. भलमार – खूप, भरपूर, जोरदार
  15. लाजरी पाणकोंबडी – White-breasted Waterhen नावाचा एक पाणपक्षी
  16. झिमुरझिमुर – रिमझिम
  17. गुलाबी मदालसा – Common Rose फुलपाखरू
  18. मोठा चांदवा – Great Eggfly फुलपाखरू
  19. चिखलपान – Mud puddling
  20. हबशी – Common Crow फुलपाखरू
  21. तृण पिलाती – Common Grass Yellow फुलपाखरू
  22. प्रवासी – Common Emigrant फुलपाखरू
  23. भेरली माड – Fish Tail Palm
  24. कुक्कुडकुंभा – Southern Coucal भारद्वाज पक्षी
  25. पावशा – Common Hawk Cuckoo एक प्रकारची कोकिळा
  26. कोचई – आळूच्या वर्गातली, आळूसारखी दिसणारी, पावसाळ्यात उगवून येणारी एक वनस्पती
  27. थोरला धोबी – White-browed Wagtail नावाचा एक प्रकारचा पाणपक्षी
  28. टकाचोर – Rufous Treepie नावाचा एक पक्षी
  29. वसू बसणे – अंड्यांवर बसणे
  30. चिखलटी – चिखलाची पट्टी, चिखल झालेला भाग
  31. दमगीर होणे – दमणे, खूप थकणे
माणूस फार लहान आहे. निसर्ग महान आहे!

मजकूर आणि सर्व फोटोः किरण वसंत पुरंदरे

    चलभाष क्रमांक – 9765818825.

 

Leave a comment

Best Choice for Creatives
This Pop-up Is Included in the Theme
Purchase Now