Skip to content Skip to sidebar Skip to footer

धसमुसळी धामण आणि मनमोहक मांजऱ्या

श्रावणातली एक कुंद दुपार. वारा पडला होता. कळकाचे कंचारे तेवढे शेंड्यात हलत होते. उष्णता आणि गदगद यांचे वार्षिक उच्चांक मोडू पाहणारा दिवस आमच्या वाट्याला आला होता! आम्ही मूळचे पुण्याचे. आमचं काही मोजू नका. पण गावातले लोकही म्हणत होते की उभ्या पावसात अशी तपन कधी झाली नव्हती. कामधाम असणारे लोक काही बोलत नव्हते. पण दुपारची फुरसद असणारे लोक ढगांमधून पाझरत उतरणाऱ्या उन्हाला वैतागले होते. चार वेळा हातपाय हलवले तरी डोक्यावरून घाम टपकत होता. उकाडा-उबारा वाढला तसा गदंका वाढला. खांद्यावरचा पटका हलवून वारा घेत मसरामाकडच्या म्हाताऱ्यानं तोंडातून हवा सोडली –

स्सूस्सूस्सूस्सूSSS

मी कूलरच्या झोतात बाजेवर कात्रीसारखा पडलो होतो. जरा आडवं व्हावं म्हटलं तरी जन्मभराच्या वैरिणीनं झडप घातली. डोळा लागला.

तेवढ्यात घराचं लोखंडी गेट वाजलं. पाठोपाठ एक राठ आवाज कानांवर आला –

‘अजी दादा आयेत का?

सरप निगाला सरप!’

सरप म्हटल्यावर मी फार कमी वेळात मोठा झालो.

मातकट पँट आणि पूर्ण बाह्यांचा निळा शर्ट घालून लालचंद ताराचंद पंधरे दारात उभा होता. खर्रा-

पान खाऊन लाल झालेले दात सहज मोजता येतील असा माझ्याकडे बघून तोंडभर हसला. मी पायात चपला अडकवल्या. लोखंडी आकड्यावर लटकवलेली सर्पकाठी उचलली आणि लालचंदबरोबर निघालो.

‘हड्या, हुड्या जीS मनमानी बोंबलत!

या खांद्यावरून त्या जागा बदलत.

सागूनचा झाड आये घराच्या काटा.

मी पायलून त हाS सरप गुंडगी मारून वसलेला

घरात नाई आये सरप.

भावेर आये भावेर!’

मी काही विचारायच्या, बोलायच्या आधीच लालचंद एवढं सगळं भरभर बोलला. यावर मी आता पाऊसकाळात साप निघणारच असं गोल बोललो. पाय फेकता फेकता लालचंदचं घर आलं. मी त्याची पाठ धरली. दोन घरांच्या मधल्या, काई (शेवाळं) धरलेल्या सांदोड्यातून आम्ही आणखी एक घर गाठलं. या घराच्या मागे परसात आलो.

साप पकडायची काठी हातात धरून दुपारच्या या वेळी मला गावातल्या नवीन कोपऱ्यात बघून

पोरंसोरं जमली. बाया जमल्या. अशी बातमी लागायला फार कमी वेळ पुरतो. पाय लांब केले तरी गोंडांचे कान घराच्या दरवाज्यांसारखे सताड उघडे असतात. संथ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात एकाएकी खळबळ व्हावी तशी माणसं जमली.

उजव्या हाताची झापी कपाळावर धरून, डोळे किलकिले करून लालचंदनं सागाच्या डाहाळीवर

पसरलेला साप दाखवला. तो सुमारे २२ फूट उंच झाडावर चढला होता. सागाच्या फताड्या पानांमधून तो स्पष्ट दिसत होता. बाहेरच्या बाजूला आलेल्या बारकुड्या फांदीला विळखा चढवून साप आराम करत होता. त्यानं त्याचं डोकं आणि चार-बोटं मान हवेत ठेवली होती. मांजरीच्या डोळ्यातील बाहुल्या उभ्या असतात. तशाच बाहुल्या असणारा हा ‘फॉर्स्टॅनचा मांजऱ्या’ या नावानं ओळखला जाणारा साप होता. आमच्या गावात या सापाला नाव नाही. जास्त चट्टेपट्टे असलेला, अंगावर रंगीबेरंगी नक्षी असलेला कोणताही मोठा साप विषारी असतो, असा एक समज आमच्या भागात आहे. ज्या साळुंक्यांनी रागे भरल्यासारखे आवाज काढून ‘साप साप’ अशी ओरड केली, त्या आजूबाजूला कुठेही दिसत नव्हत्या. सदोदित कलकल करणाऱ्या साळुंक्यांच्या जमावातला एक सभासद मांजऱ्यानं मटकावला असावा अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली.

मांजऱ्या साप, त्याच्या पोटावरचा फुगवटा वघा.

याप्रसंगी मी जमलेल्या गावकऱ्यांना सांगितलं –

‘हा साप काही कुणाच्या घरात आलेला नाही. तो पक्षीबिक्षी मारायला झाडावर चढला असणार. तो.

तुम्हाला काही करणार नाही. चावणार नाही. घरात येणार नाही. तो त्याच्या वाटेनं निघून जाईल. तुम्ही

काळजी करू नका. मी थोड्या वेळानं पुन्हा येईन!’

माझ्या भाषणावर कुणीही काहीही बोललं नाही.

लोकांनी सापाचा धसका घेतला होता.

दुलीचंद ताराचंद पंधरे यांचं परसू सोडताना माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सागाच्या झाडाला टेकवून ठेवलेला बांबू उचलून लांब केला तर सापाच्या दोन हात पुढे जाईल एवढा मोठा होता. मी गेल्यानंतर चार घरातल्या बाया-बाया एकत्र आल्या आणि त्यांनी पोराबाळांचं कारण सांगून जर एखाद्या बाप्याला गळ घातली, तर? आपण जर सुस्ती केली, तर लोक या सापाला ठेवणार नाहीत याबद्दल माझी जवळजवळ खात्री पटली. कारण साप घरादारात आला होता. 

 

तेवढ्यात बातमी आली की आमच्याच गावात श्री. राजेश मोतीराम कोटांगले यांच्या विश्रामगृहाच्या मागे धामण (Indian Rat Snake) निघाली आहे. कमरक किंवा कमरख (आमच्या भागातलं नाव ‘आमरस’) (Star Fruit) या झाडाच्या भोवती गुंडाळलेल्या जाळीत धामण अडकली होती. ही मासे पकडायची जाळी होती. गावातले पोट्टे चोरून आमरस खातात म्हणून श्यामदास मोरेश्वर वलके या विश्रामगृहाचं हवं-नको बघणाऱ्या तरूणानं झाडाचं बूड धरून कंबरभर उंचीपर्यंत जाळी लावून बंदोबस्त केला होता. उंदराच्या मागावर सांदी-कोपरे धुंडाळत, फिरत फिरत आलेली एक धामण नेमकी या जाळीत अडकली. मोठी ताकद लावून धामणीनं स्वत:ला जाळीतून सोडवण्याचा प्रयत्न केला.

धामण म्हणजे जणू दोरखंड.
चावायला कहर.

एक नैसर्गिक प्रतिसाद म्हणून तोंडाकडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात तिचं पिळदार शरीर आणखी गुंतत
गेलं. धामण चवताळून उठली. त्यामुळे गुंता वाढला. तोंडापासून दिड-वीत जागेवर नॉयल्लॉनचे धागे अंगात
करकचून रूतले.

ही धामण सोडवायची म्हणजे मोठा खटाटोप होता. तिला कोणतीही जखम होऊ न देता सोडवणं महत्त्वाचं होतं. तिला समोरून पकडणं म्हणजे तिच्याकडून कडोकडो चावून घेण्यासारखं होतं.

सागावरचा मांजऱ्या आणि जाळीत अडकलेली धामण हे दोन्ही साप वाचवायचे असं मी ठरवलं. पटकन फोन केला. युवराज मनोहर बोबडे, सौरभ गोपालन राऊत आणि बॉबी अविनाश चूत्रे हे प्राणिमित्र अर्ध्या-पाऊण तासात आले.

युवराजनं धामणीला हात घातला. पहिल्यांदा त्यानं कमरखाच्या बुडाकडच्या फूटभर लांबीच्या फांद्या तोडल्या. हळूहळू धामण दिसू लागली. ती काळ्या रंगावर होती. जाळ्याचा शेवटचा धागा कातरला, तशी धामण हातात आली. युवराजनं शेपटी पकडून तिला बाहेर काढलं. जाळ्यातून सुटलेली धामण उसळू लागली. तिनं नजर ठरणार नाही अशी सळसळ करताच मला बघू – मला बघू म्हणून तोंडं घालणारी पोरं दचकून चार पावलं मागे सरकली. धामण पलट्या मारू लागली. भिंगरीसारखी शेपटीच्या भोवती फिरू लागली. आळेपिळे देऊ लागली. जमिनीवर तोंड टेकवलं तशी ती सपाट्यानं पुढे सरकू लागली. युवराजनं तिच्या मानेवर सर्पकाठीचा आकडा दाबला आणि तिचं तोंड पकडलं. डोक्यावर अंगठा दाबून गळ्याची पकड घट्ट केली. मग एक एक करून घट्ट रूतलेले नॉयलॉनचे धागे कापून काढले. सुदैवानं धामणीला कोणतीही जखम झाली नव्हती. कुठेही रक्‍त येत नव्हतं. धामण मोकळी झाली. पोरासोरांनी एकच गिल्ला केला.

मी आवाज दिला – ‘पंढरीनाथ महाराज कीSS’

पोरं ओरडली – ‘जय!’

युवराजनं पूर्ण काळजी घेऊन धामण पोत्यात ठेवली. पोत्याचं तोंड बंद केलं.

आमच्या भागात, म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मासे पकडायच्या जाळ्यांमध्ये अडकणारे साप ही एक वरचेवर घडणारी घटना आहे. वानरं खातात म्हणून फळांवर आलेला आंबा किंवा कमरख अशी झाडं आच्छादण्यासाठी, भाजीच्या वाडीच्या भोवती आडोसा म्हणून, कोंबड्यांच्या खुराड्यांना सापांपासून संरक्षण म्हणून, स्वत:च्या मालकीची जागा निश्‍चित करण्यासाठी… वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या कारणांसाठी अशा जाळ्या सर्रास वापरल्या जातात. या जाळ्यांमध्ये पट्टेरी मण्यार किंवा सतरंज्या (Banded Krait), नाग (Spectacled Cobra), अजगर (Indian Rock Python), घोणस (Russell’s Viper), धोंड्या किंवा विरूळा (Checkered Keelback), तस्कर (Common Trinket Snake) असे साप सापडल्याची नोंद करण्यात आली आहे.

आम्ही मांजऱ्या सापाकडे आलो.

शिडी लावून झाडावर चढायचं आणि साप ज्या फांदीवर होता, ती बांबूनं हलवून साप खाली पाडायचा, असं ठरलं. पण झाडाला टेकवून ठेवलेला बासोडा हातात घेतला, तेव्हा झाडावर चढायची काहीच गरज नाही, हे लक्षात आलं. युवराजनं बांबू लांब करून सापाची गुंडाळी सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. बांबूचा स्पर्श होताच फांदीला घातलेला विळखा सोडवून साप मुख्य झाडाकडे सरकू लागला. तो झाडावर आणखी पुढे गेला असता, तर त्याला पकडणं खूप अवघड गेलं असतं. म्हणून युवराजनं ती फांदी हलवली. साप झोके घेऊ लागला. शेपटीतल्या स्नायूंची ताकद वापरून झुलु लागला. कुणालाही काहीही कळायच्या आत आख्खा साप अलगद बांबूच्या टोकावर आला. युवराजनं जमलेल्या लोकांना बाजूला व्हायला सांगून पटकन बांबू खाली घेतला. भारी सुंदर साप होता. तांबड्या मातीवर एखाद्या दागिन्यासारखा दिसत होता. या सापानं सागाच्या झाडावर चढून शिकार साधली होती. एवढ्या उंचीवरसुद्धा त्याला वाघूळ, उंदीर, पाल किंवा दुसरा साप मिळणं अशक्य नव्हतं. मेल्यासारखं पडून रहायचं आणि भक्ष्य टप्प्यात येताच फार वेगात शरीर ताणून ते तोंडात पकडायचं, अशी अटकळ वापरून हा साप शिकार करतो.

गिळलेली शिकार सापाच्या पोटात होती. डोक्यापासून सुमारे २ फूट अंतरावर दिसणारा डंभारा (फुगवटा) त्याचा पुरावा होता. झाडावरून माणसात आलेला साप एकदम आखडला. त्यानं स्वत:ची अर्धी चुंबळ केली. मानेच्या मोडीत डोकं लपवलं. तो हालचाल बघू लागला. युवराजनं थोडी जवळीक करताच तो फुसपुसला. गुंडाळून घेतलेली मान ताणून त्यानं तोंड फाडलं आणि हवेचा चावा घेतला. रिकाम्यापोटी तो ज्या कला-करामती दाखवतो, त्या बघता, पोटात खाद्य असलेला मांजऱ्या मला अगदीच ब्लॅक-अँड-व्हाइट वाटला. आजूबाजूला जमलेल्या गावकऱ्यांना नीट पाहता यावं म्हणून आम्ही काही वेळ जाऊ दिला. त्याला अजिबात हात न लावता पोत्यात घालायचं असं ठरलं. कुणीतरी पोतं आणलं. त्याचं तोंड उघडून जमिनीवर सापाच्या जवळ ठेवलं.शेपटीच्या बाजून दोन तीन हलके टप्पू मारताच तो हळूहळू पोत्यात गेला. तो पूर्णपणे आत, पोत्याच्या तळाशी गेला आहे याची खात्री पटताच सौरभनं पोतं उचललं. पोत्याच्या तोंडाला पिळे देऊन ते बंद केलं.

मूर्तिमंत चैतन्य अशी धामण आणि जरा ढेपाळलेला पण देखणा असा मांजऱ्या त्याच दिवशी युवराज आणि त्याच्या मित्रांनी योग्य अधिवासात सोडून दिला. मी युवराजला निरोप पाठवला – 

‘ठनान रे बोंदऱ्याSSS!’

सर्पमित्र आणि सतत नवीन बातम्या देणाऱ्या पिटेझरी गावातील गोंड आदिवासी मुलांसह लेखक
Best Choice for Creatives
This Pop-up Is Included in the Theme
Purchase Now